

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : लाहोरमध्ये पोलीस आणि इस्लामी संघटना तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) यांच्यात शनिवारीही हिंसक संघर्ष सुरूच राहिला. आंदोलक राजधानी इस्लामाबादच्या दिशेने पॅलेस्टाईन समर्थक रॅलीसाठी मोर्चा काढत होते, ज्यांना सुरक्षा दलांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पंजाब पोलिसांना इस्रायली गुंड संबोधत टीएलपीने दावा केला आहे की, पोलिसांनी आंदोलकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, ज्यात त्यांच्या 11 जणांचा मृत्यू झाला आणि 50 हून अधिक जण जखमी झाले.
सकाळपासून टीएलपीचे 11 जण मारले गेले आहेत. सतत गोळीबार आणि शेलिंग सुरू आहे, असे या कट्टरतावादी इस्लामी गटाचा एक नेता व्हायरल व्हिडीओमध्ये बोलताना ऐकू येत आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवर गोळीबाराचे आवाज येत आहेत.
गुरुवारी इस्रायलकडून गाझामध्ये होणाऱ्या हत्यांच्या विरोधात सुरू झालेली ही निदर्शने शनिवारी अधिकच तीव्र झाली. कारण, पोलिसांनी अनेक ठिकाणी अश्रुधूर आणि लाठीमार सुरू केला. आंदोलकांनी प्रत्युत्तर म्हणून पोलिसांवर दगडफेक केली, ज्यात अनेक पोलीस जखमी आहेत. लाहोरच्या आझादी चौकाजवळ संघर्ष अधिकच चिघळला, जिथे पोलिसांची अनेक वाहने जाळण्यात आली आणि अनेक अधिकारी जखमी झाले.
अनेक भागांमध्ये पोलिसांनी बॅरिकेडस् लावले, शिपिंग कंटेनर ठेवले आणि अगदी खंदकही खोदले, जेणेकरून संघटनेचा प्रमुख साद रिझवीच्या नेतृत्वाखालील हजारो टीएलपी आंदोलकांना अमेरिकन दूतावासाजवळ निदर्शने करण्यासाठी इस्लामाबादकडे जाण्यापासून रोखता येईल. लाहोर इस्लामाबादपासून सुमारे 370 किलोमीटर अंतरावर आहे. अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना मोठ्या गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा आणि आपल्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे.
इस्रायलकडून गाझामध्ये होणाऱ्या हत्यांच्या विरोधात तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानने सुरू केलेली निदर्शने, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीनंतर हिंसक झाली. यामुळे इस्लामाबाद आणि रावळपिंडीमधील जनजीवन सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाले.