Aparna Yadav : मुलायम सिंह यादवांच्या सुनेचा भाजपमध्ये प्रवेश

Aparna Yadav : मुलायम सिंह यादवांच्या सुनेचा भाजपमध्ये प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादवांनी भाजपमधील नाराज नेत्यांना हेरून आपल्या पक्षात घेण्याचा सपाटाच लावला होता. त्यामध्ये भाजपचे आमदार आणि विद्यमान सरकारमधील काही मंत्रीदेखील सहभागी होती. या पार्श्वभूमीवर भाजपनेदेखील चांगली खेळी केलेली दिसते. कारण, भाजपने थेट यादवांच्या घरातच सुरुंग लावला आहे. कारण, मुलायम सिंह यादव यांची लहान सून अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांची सून अपर्णा यादव यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून प्रचाराला सुरुवातही झाली आहे. या पार्श्वभूमीवर अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश म्हणजे सपासाठी धक्का मानला जात आहे. भाजपचे उत्तर प्रदेश अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंग तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत अपर्णा यादव यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.

अपर्णा यादव (Aparna Yadav) या मुलायम सिंह यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतीक यादव यांची पत्नी आहे. यापूर्वी अपर्णा यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं उघड उघड कौतुक केलेलं आहे. २०१७ मध्ये लखनऊ कॅंटमधून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये रीटा बहुगुणा जोशी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

दिल्लीच्या भाजप कार्यालयात अपर्णा यादव यांनी सांगितले की, "माझ्या विचारांत पहिल्यांदा राष्ट्र महत्वाचं आहे. त्यामुळे मी राष्ट्राच्या आराधनेसाठी बाहेर पडली आहे. मी पहिल्यापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवरून प्रभावित आहे." उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी त्यांचं स्वागत केलं आहे.

अपर्णा यादव यांच्याविषयी… 

अपर्णा यादव या मुलायम सिंह यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांच्या मुलाची म्हणजेच प्रतीक यादव यांची पत्नी आहे. त्यांचे वडील पत्रकार आहेत. त्यांनी ब्रिटनमधील मॅंचेस्टर विद्यापीठातून इंटरनॅशन रिलेशन एण्ड पाॅलिटिक्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. २०१०- मध्ये प्रतीक यादव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. काही काळानंतर अखिलेख यादवांची पत्नी डिंपल यादव यांच्याशी फारसे पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा विचार केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news