Pegasus Spyware software म्हणजे काय? पाळत ठेवता येते का? | पुढारी

Pegasus Spyware software म्हणजे काय? पाळत ठेवता येते का?

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : संसदेचे पावसाळी अधिवेशन कालपासून (दि.१९) सोमवारी सुरू झाले. पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधार्‍यांची चांगलीच कोंडी केली. हा देशाच्या सुरक्षेचा अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याचे सांगून विरोधकांनी सत्ताधार्‍यांना भंडावून सोडले. हेरगिरीसाठी इस्रायली Pegasus Spyware software वापरले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. पत्रकार आणि राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत. त्यांच्यावर हेरगिरीसाठी इस्रायली Pegasus Spyware software चा वापर केला जात असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी लोकसभेमध्ये रेटून धरली.

Pegasus Spyware software काय आहे?

पेगासस हे एक स्पायवेअर सॉफ्टवेअर आहे. इस्त्रायलच्या एनएसओ ग्रुपकडून हे स्पायवेअर बनवण्यात आले. हा स्पायवेअर काही जणांच्या फोनमध्ये सोडण्यात आल्याचे म्हणणे आहे.

फ्रान्सच्या फॉरबिडन स्टोरीज या मीडिया नॉन प्रॉफिट संस्था आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संघटनेकडे एनएसओच्या फोन नंबरचा डेटा होता.

त्यांनी पेगासस प्रोजेक्ट नामक मोहिम राबवून जगभरातील मीडिया संस्थांना ही माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलवर भारतात सध्या बंदी आहे.

परदेशी कंपन्या आणि काही मोबाईल अ‍ॅपकडून देशातील पत्रकार, बडे राजकीय नेते आणि सुरक्षा एजन्सीच्या माजी प्रमुखांसह इतर काही महत्त्वाच्या व्यक्तींची Pegasus Spyware चा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार विरोधी पक्षांनी संसदेत उघडकीस आणला.

Pegasus Spyware software नेमकं काय आहे प्रकरण?

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इस्रायली पेगासस नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लोकांच्या व्हॉटसअॅपवर पाळत ठेवल्याची माहिती 2019 मध्ये उघड झाली.

व्हॉट्स अॅपनं यासंदर्भात एनएसओ (NSO) या कंपनीला कोर्टात खेचल्यानंचर संपूर्ण जगाच लक्ष याकडे वेधलं गेलं.

इस्रायलच्या NSO या इस्त्रायली सायबर इंटेलिजन्स कंपनीनं पेगासस सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे.

या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपची यंत्रणा भेदून पत्रकार, वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याचं व्हॉट्सअपनं जाहीर केलं.

NSO या कंपनीनं मात्र त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले.

Pegasus Spyware software चा 45 देशांमध्ये संचार

‘पेगासस’ एक स्पायवेअर असून, इस्रायलमधील ‘एनएसओ’ ग्रुप या पाळत ठेवणार्‍या कंपनीने ते विकसित केले आहे. याआधारे मोबाईल हॅक करता येऊ शकतो.

हॅक केलेल्या फोनमधील कॅमेरा, माईक, मेसेज तसेच कॉल्स, पासवर्ड, कॅलेंडर, व्हिडीओ, लोकेशन, व्हॉटस्अ‍ॅप कॉल अशी इत्थंभूत माहिती हॅकरला प्राप्त होते. ‘पेगासस’ ऑपरेट करणारी व्यक्ती कॅमेरा तसेच मायक्रोफोनही ऑपरेट करू शकते.

सुरुवातीला स्पायवेअरद्वारे मोबाईलवर एक लिंक पाठवली जाते. ती क्लिक केली की, हे स्पायवेअर मोबाईलमध्ये इन्स्टॉल होते आणि मोबाईलचे नियंत्रण हॅकरकडे जाते. अशा लिंकवर क्लिक न करताही हे स्पायवेअर मोबाईलमध्ये प्रवेश करू शकते.

2019 मध्ये व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून हे स्पायवेअर काही मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्याचे उघड झाले आहे.

मोबाईलमध्ये प्रवेश केल्यानंतर ‘पेगासस’ कोणताही पुरावा मागे सोडत नाही. थोडक्यात, तुमचा फोन हॅक झाला आहे, हे तुम्हाला समजणारही नाही. फोन लॉक असला तरी हे स्पायवेअर कार्यरत राहते.

अँड्रॉईडच्या तुलनेत सुरक्षित मानल्या जाणार्‍या आयफोनची आयओएस ही ऑपरेटिंग प्रणालीही याद्वारे हॅक करता येते.

या स्पायवेअरचा भांडाफोड करणार्‍या सिटीझन लॅबच्या माहितीनुसार, 45 देशांमध्ये हे स्पायवेअर अस्तित्वात आहे.

2016 मध्ये या स्पायवेअरद्वारे हेरगिरीचे पहिले प्रकरण उघडकीस आले.

फोन टॅपिंग देशहितासाठी ः वैष्णव

 

हेरगिरी सुरू असल्याचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. फोन टॅपिंगसंबंधी सरकारचे नियम अत्यंत कठोर आहेत.

डेटाचा हेरगिरीशी कसलाही संबंध नाही. केवळ देशहितासाठी तसेच सुरक्षेसंबंधी प्रकरणातच टॅपिंग केली जाते, असे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले.

फोनच्या तांत्रिक विश्लेषणानंतरच फोन हॅक करण्यात आला आहे की नाही? किंवा त्यासोबत छेडछाड करण्यात आली की नाही? ते स्पष्ट होते. केवळ यादीत नंबर आहे, याचा अर्थ हेरगिरी केली जात आहे, असा होत नाही.

यासंबंधी तथ्यांचा अभ्यास करून तांत्रिक द़ृष्टिकोनातून ही बाब समजून घेण्याचे आवाहन वैष्णव यांनी केले.

एका कन्सोर्टियमने 50 हजार फोन नंबरचा लीक डेटाबेस मिळवला असल्याच्या आधारे प्रसारमाध्यमांनी हे वृत्त प्रकाशित केले, असे स्पष्ट करीत वैष्णव यांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

यादीत समावेश असलेल्यांपैकी काहींच्या फोनची हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

परंतु, डेटात क्रमांक असल्याने संबंधित डिव्हाईस ‘पेगासस’ने प्रभावित झाला किंवा तो हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा त्याचा अर्थ होत नाही, असेही वैष्णव म्हणाले.

हेरगिरीवरून काँग्रेस आक्रमक

काँग्रेसचे नेते, माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी ‘पेगासस’ सॉफ्टवेअरप्रकरणी सरकारला सोमवारी धारेवर धरले.

आम्हाला माहिती आहे की, तुमच्या फोनमध्ये असलेली सर्व माहिती ते घेत आहेत, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी ‘पेगासस’ असा हॅशटॅग टाकला आहे.

राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे सभागृहात काँग्रेस या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे अगोदरच स्पष्ट झाले होते.

लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अंधीर रंजन चौधरी यांनीदेखील ‘पेगासस’संबंधी सरकारवर टीका केली आहे. देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आहे. लोकसभा अधिवेशनादरम्यान हा मुद्दा सदनात उपस्थित करण्याचा इशारा चौधरी यांच्याकडून देण्यात आला होता.

उद्या, मंगळवारीदेखील विरोधकांकडून या मुद्द्यावर गदारोळ घातला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘पेगासस’ सॉफ्टवेअर हॅकिंग आहे, टॅपिंग नाही : ओवैसी

‘पेगासस’ सॉफ्टवेअर हॅकिंग आहे, टॅपिंग नव्हे! एखाद्या व्यक्तीने अथवा सरकारकडून करण्यात येणारे हॅकिंग एक गुन्हा आहे. सरकारने ‘एनएसओ’ स्पायवेअरचा वापर केला का? सरकारने वृत्तामध्ये नाव असलेल्यांची हेरगिरी केली का? या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असे ट्विट ‘एमआयएम’प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केले.

देशाची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न ः केंद्र सरकारचा खुलासा

केंद्र सरकारने विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. देशाची प्रतिमा मलीन करण्याचे काम या माध्यमातून केले जात असल्याचा खुलासा केंद्र सरकारने केला आहे.

देशवासीयांच्या गोपनीयतेच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे केंद्राने म्हटले आहे.

देशात इंटरसेप्शनसाठी आधीपासूनच कडक प्रोटोकॉलचे पालन केले जाते. राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित प्रकरणांमध्ये केंद्र वा राज्य सरकारच्या एजन्सी सर्विलन्स यंत्रणेचा वापर करते. याची उच्चस्तरीय देखरेख केली जाते.

देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञानमंत्र्यांनी अनधिकृतरीत्या पाळत ठेवली जात असल्याच्या कुठल्याही घटना घडल्या नसल्याचे यापूर्वीच संसदेत सांगितले असल्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. राजेंद्र कुमार यांनी दिली यापूर्वीच दिली होती.

काही विशिष्ट लोकांवर सरकार पाळत ठेवत असल्याच्या आरोपाला कुठलाही आधार नाही. यापूर्वीही व्हॉटस्अ‍ॅप ‘पेगासस’ने हॅक करण्यासंबंधीचे आरोप लावण्यात आले होते. याला कसलाही आधार नाही.

देशाची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे आरोप केले जात असल्याचे केंद्र सरकारकडून यापूर्वीच सांगण्यात आले आहे.

‘पेगासस’ने आतापर्यंत हॅक केले जगातील 1,400 मोबाईल क्रमांक

गेल्या काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ‘पेगासस’ सॉफ्टवेअरचा वापर करून भारतातील अनेक पत्रकार, नेते तसेच इतर लोकांचे फोन हॅक केल्याचा दावा करण्यात आला आहे. जगभरातील महत्त्वाचे सुमारे 1,400 मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगासस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगासस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या ‘एनएसओ’ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या 2019 मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटस्अ‍ॅप या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था-‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा 2019 च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.

‘पेगासस’च्या यादीत 40 पत्रकार, 2 मंत्री आणि न्यायाधीशही

‘पेगासस’च्या यादीत भारतातील 40 पत्रकारांसह 3 प्रमुख विरोधी पक्षनेते, 2 केंद्रीय मंत्री आणि एका न्यायाधीशाचाही समावेश आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय परिस्थितीवर जे पत्रकार, वरिष्ठ संपादक शोधपत्रकारिता, विशेष वृत्त आणि वार्तांकन देत होते, अशा 40 जणांचा समावेश इस्रायली नेटवर्क ‘पेगासस’ने आपल्या यादीत केला होता.

फ्रान्सच्या फॉरबिडन स्टोरीज् आणि अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनलने ही माहिती संकलित केली आहे.

तसेच या यादीत 3 विरोधी पक्षनेते, 2 विद्यमान मंत्री आणि एका न्यायाधीशाचाही समावेश आहे.

यादीत पत्रकारांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. ती लवकरच पुढे येतील, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे.

हिंदुस्थान टाइम्स, इंडिया टुडे, नेटवर्क-18, द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेसच्या प्रमुख पत्रकारांची हेरगिरी करण्यात येत आहे.

वॉशिंग्टन पोस्टने केलेल्या दाव्यानुसार, हिंदुस्थान टाइम्सचे शिशिर गुप्ता आणि द वायरचे सिद्धार्थ वरदराजन यांचीही हेरगिरी करण्यात आली आहे.

पहिल्या यादीनुसार, जगभरातील 180 पत्रकारांची हेरगिरी होत आहे.

त्यामध्ये फायनान्शियल टाइम्स, न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन, फ्रान्स 24, द इकॉनॉमिस्ट, एपी आणि रॉयटर्सचे पत्रकार आणि संपादकांचा समावेश आहे.

द गार्डियनने दिलेल्या माहितीनुसार, काही देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे नंबरही हेरगिरीच्या यादीत आहेत.

शिवाय, उद्योगपती, एनजीओ, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतील नेते, कामगार युनियन नेते आणि काही सरकारी कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

हेरगिरीसाठी इस्रायलच्या ‘पेगासस’ सॉफ्टवेअरचा वापर

सखोल चौकशीसाठी विरोधकांचा रेटा; पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला घेरले

केवळ देशहिताच्या मुद्द्यावरच फोन टॅपिंग होते : दूरसंचारमंत्र्यांचा खुलासा

Back to top button