नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनावरील उपचार पद्धतीत 'मोल्नुपिरावीर' औषधाचा समावेश करू नये, असा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) कोरोनाविषयक राष्ट्रीय टास्क फोर्सने काढला आहे. 'मोल्नुपिरावीर'च्या अनुषंगाने सुरक्षाविषयक चिंता असल्याचे गेल्या आठवड्यात 'आयसीएमआर'चे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले होते. (Molnupiravir)
अँटिव्हायरल ड्रग 'मोल्नुपिरावीर'चा वापर 15 ते 45 वयोगटातील महिला कोरोनाग्रस्तांवर करण्यात येऊ नये, असा इशारा 'नॅशनल टेक्निकल अॅडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन'नेही मंगळवारी दिला होता.
'एनटीएजीआय'चे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले की, जे ज्येष्ठ आधीच अन्य आजारांनी पीडित आहेत, त्यांना कोरोना बाधा झाल्यास हे औषध द्यावे. प्रजननक्षम वयातील बाधितांना विशेषत: महिलांना मात्र ते धोकादायक ठरू शकते. गतवर्षी डिसेंबरमध्ये आरोग्य मंत्रालयाने या औषधाच्या वापराला मंजुरी दिली होती.
भारतात ही कॅप्सूल ऑक्सिजन पातळी 93 टक्क्यांवर असलेल्या रुग्णांना तसेच गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांनाच देण्यात येईल, असे ठरले होते. डॉक्टरांनी लिहून दिल्याशिवाय हे औषध देण्यास बंदी होती.