

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) एका मोठ्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. दक्षिण-पूर्व जिल्ह्यात केलेल्या कारवाईत पोलिसांनी सुमारे 10 टन रक्तचंदन (लाल चंदन) जप्त केले असून, याप्रकरणी दोन तस्करांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रक्तचंदन आंध्र प्रदेशातील तिरुपती येथून दिल्लीत तस्करी करून आणले जात होते. या मोठ्या मालाची वाहतूक गुप्तपणे केली जात होती, परंतु पोलिसांच्या विशेष कृती दलाला मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वी झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात या रक्तचंदनाची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या मौल्यवान लाकडाला विदेशात मोठी मागणी असल्याने त्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. पोलिसांच्या या कारवाईमुळे रक्तचंदनाच्या तस्करी करणार्या आंतरराष्ट्रीय टोळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जातेय.