

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोदींच्या कॅबिनेटचा ७ जुलै रोजी विस्तार झाला. यात ७ महिलांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. आता मोदींच्या मंत्री मंडळात महिला मंत्र्यांची संख्या वाढून ११ झाली आहे. निर्मला सीतारमण, स्मृती इराणी, साध्वी निरंजन ज्योती आणि रेणुका सिंह अगोदरपासूनच मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. जाणून घेऊया या महिला मंत्र्यांना कोणती जबाबदारी दिली आहे.
भाजपच्या मीनाक्षी लेखी, प्रतिमा शौमिक, दर्शना जरदोश, अन्नपूर्णा देवी, भारती पवार, शोभा कारंदलजे, आणि अनुप्रिया पटेल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अनुप्रिया पटेल यांना सोडून ६ महिला नेत्यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे. या सात महिला मंत्र्यांव्यतिरिक्त अर्थमंत्री निर्मला सीतारमण, महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती आणि रेणुकासिंग सरुता यांचा यापूर्वीच मंत्रिपदात समावेश आहे.
भारती पवार राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष होत्या, जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं काम आहे. भारती पवार स्वत: डॉक्टर आहेत. त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे. त्यांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आणि कामं आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार असताना, लाखांच्या घरात मतं मिळवली आहेत.
२०१९ च्या लोकसभेत त्या भाजपच्या तिकीटावर जिंकल्या. डॉ. भारती पवार यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट महिला खासदार म्हणून घोषित केले आहे. डॉक्टर-राजकारणी झालेल्या भारती यांनी २००२ मध्ये एमबीबीएस पदवी मिळवली आहे.
दिल्लीच्या लोकसभेच्या खासदार मीनाक्षी लेखी यांना परराष्ट्र राज्यमंत्री केले आहे. यासह, त्यांना सांस्कृतिक मंत्रालयात राज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे. मीनाक्षी लेखी पहिल्यांदाच केंद्र सरकारमध्ये मंत्री झाल्या आहेत.
२०१४ मध्ये मीनाक्षी लेखी यांना पहिल्यांदा नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार आशिष खेतान यांनी पराभूत केले होते. २०१९ मध्ये दुसर्या वेळी नवी दिल्ली संसदीय मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते अजय माकन यांना पराभूत करून त्या लोकसभेत पोहोचल्या. मीनाक्षी लेखी या वकील आहेत.
प्रतिमा भौमिक यांनी बुधवारी मंत्री पदाची शपथ घेतली. त्या त्रिपुराच्या पहिल्या महिला नेत्या आहेत ज्या केंद्रीय मंत्री झाल्या आहेत. ५२ वर्षीय भौमिक 'प्रतिमा दी' या नावाने प्रसिध्द आहेत. प्रतिमा भौमिक यांना सामाजिक न्याय सशक्तीकरण मंत्रालायमध्ये राज्यमंत्री पद मिळाले आहे.
भौमिक या पहिल्यांदा २०१९ मध्ये पश्चिम त्रिपुरा लोकसभा मतदार संघातून खासदार झाल्या आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात गुजरातच्या तीन वेळा खासदार झालेल्या दर्शना जरदोश यांचा समावेश करण्यात आला आहे. ६० वर्षीय जरदोश या ओबीसी समाजातील आहेत. त्यांना रेल्वे राज्यमंत्री पद दिले आहे. यासह वस्त्रोद्योग मंत्रालयातही राज्यमंत्री म्हणून त्यांना जबाबदारी दिली आहे.
दर्शना जरदोश यांनी २००९, २०१४, आणि २०१९ या तीन टर्ममध्ये सूरत लोकसभा मतदारसंघातून जिंकल्या आहेत. १९८० च्या दशकात जरदोश सूरत भाजपच्या प्रभाग क्रमांक आठ समितीचे उपाध्यक्ष होते. आणि नंतर २००० मध्ये या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आल्या.
झारखंड च्या कोडरमा चे खासदार अन्नपूर्णा देवी यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांना केंद्रात शिक्षण राज्यमंत्री पद मिळाले आहे. अन्नपूर्णा देवी या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत. यापूर्वी त्या आरजेडीमध्ये होत्या. पण २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला .
खासदार अन्नपूर्णा या रमेश प्रसाद यादव यांच्या पत्नी आहेत. रमेश यादव हे १९९८ मध्ये एकात्मिक बिहारचे मंत्री होते. रमेश प्रसाद यादव यांच्या निधनानंतर, अन्नपूर्णा यांनी १९९९ मध्ये विधानसभा पोटनिवडणूक लढविली आणि ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर एका वर्षानंतर विधानसभा निवडणुकीत अन्नपूर्णा पुन्हा विजयी झाल्या. त्यानंतर बिहार सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले होते.
झारखंड हे वेगळ राज्य झाल्यानंतर अन्नपूर्णा देवी यांनी २००५ आणि २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. वर्ष २०१३ मध्ये हेमंत सोरेन सरकारमध्ये आरजेडीच्या कोट्यातून जल संधारण मंत्री बनल्या. २०१४ मध्ये त्यांना कोडरमा विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला समोरे जावे लागले होते.
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरचे खासदार अनुप्रिया पटेल यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. अनुप्रिया पटेल २०१४ आणि २०१९ मध्ये पुन्हा उत्तर प्रदेशच्या मिर्जापूरमधून लोकसभेतून निवडून आल्या. अनुप्रिया पटेल यांच्याकडे २०१६ ते २०१९ या काळात केंद्रीय आरोग्य मंत्रालयात राज्यमंत्री पदाचा पदभार होता.आता त्यांच्याकडे वाणिज्य व उद्योग राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
५४ वर्षीय शोभा कारंदलजे कर्नाटकातील उडुपी-चिकमंगलूरच्या खासदार आहेत. कारंदलजे यांना कृषी राज्यमंत्री पद मिळाले आहे. कर्नाटक सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री पद देखील सांभाळले आहे. कारंदलजे या कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे सुरुवातीच्या काळापासून जवळचे मानले जातात.
२००४ च्या विधानसभा निवडणुकीत बंगळुरूच्या यशवंतपूर येथून जिंकून त्यांनी पहिल्यांदा आमदार झाल्या. येडियुरप्पा सरकारमध्ये त्यांना ग्रामविकास व पंचायत राज मंत्रीपद मिळाले.