

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सहज ताब्यात घेऊन तपासणी केलेला आरोपीच बँकेची कॅश घेऊन जाणारी व्हॅन पळवणारा आरोपी निघाला. त्याला ताब्यात घेण्यासाठी ओरिसा पोलीस नागपुरात आले आहे. लकडगंज पोलिसांच्या हद्दीतील गंगाजमना वस्तीजवळ आरोपी जयराम माझी गुरूवारी रात्री उशिरा संशयास्पद फिरत होता. कंटाळून तो एका दारू भट्टीवर दारू पिण्यास गेला. त्यावेळी त्याच्याजवळ भरपूर कॅश होती. लकडगंज पोलिसांच्या खबऱ्याने डीबी पथकाला याची माहिती दिली.
माहिती मिळताच डीबी पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. आपण एका बँकेच्या सीएसएम व्हॅनवर ड्रायव्हर होतो. बँकेत कॅश घेऊन जाताना चोरट्यांनी आपल्याला लुटले, अशी कथा त्याने सांगितली. ओरीसातील राजाखरीपार पोलीस ठाण्यातंर्गत येत असलेल्या नयापारा येथील असल्याचे त्याने सांगितले.
लकडगंज पोलिसांनी राजाखरीपार पोलिसांशी संपर्क साधून घटनेची खातरजमा केली असता वेगळीच माहिती समोर आली. बँकेची कॅश नेणाऱ्या व्हॅनवरील नियमित ड्रायव्हर सुटीवर असल्याने जयराम माझी याला बदली ड्रायव्हर म्हणून ठेवले होते. कॅश घेऊन जाताना सिक्युरीटीला गुंगारा देऊन जयराम माझीने व्हॅनच पळवली. लकडगंज पोलिसांना त्याच्या जवळ २ लाख १२ हजार रोख मिळाले. माहिती मिळताच ओरीसा पोलिसांनी शुक्रवारी नागपूर गाठले. ते काही ठिकाणी तपास करून आरोपी जयराम माझी याला सायंकाळी घेऊन जाणार असल्याचे लकडगंज पोलिसांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?