

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील प्रसिद्ध रबडीवालाजवळ मौदा टी पॉईंट परिसरात आज (दि. ११) मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने शेकडो मेंढ्या चिरडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ४२ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला असून या कळपातील अनेक मेंढ्या जखमी असल्याची माहिती आहे.
पहाटेची वेळ असल्याने या घटनेनंतर मेंढ्यांना चिरडणारे भरधाव वाहन घटनास्थळावरून फरार झाले आहे. या अपघातानंतर सुमारे 100 ते 150 मीटर पर्यंत या रायपूर महामार्गावर मेंढ्यांचे मृतदेह पडलेले होते. सध्या शेतात पिकांची पेरणी सुरू असल्याने हा मेंढ्यांचा कळप राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ नागपूर-भंडारा मार्गावरून परत जात असताना मौदा टी पॉईंटवर हा अपघात घडला. या अपघातास कारणीभूत अज्ञात वाहन ट्रक असून सीसीटीव्हीद्वारे त्याचा, चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.