

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मराठा समाज एकरावरून गुंठ्यावर आला आहे. गावोगावी शेकडो तरूण बेरोजगार आहेत. यापुर्वी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होता. मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने श्वेतपत्रिका काढावी. सध्या नेत्यांना गावबंदी असल्याने लोकप्रतिनिधींची अडचण होत आहे. मराठा आरक्षणाचा राजकीय लोकांनी पांढर्या कपड्यावाल्यांनी खेळ केल्याचा गंभीर आरोप वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू पाटील नवघरे यांनी सभागृहात करीत आरक्षण देण्याची आग्रही मागणी केली.
बुधवारी आमदार नवघरे यांनी वसमत विधानसभा मतदार संघातील महत्वाच्या प्रश्नांसह मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणावर भाष्य केले. छत्रपती संभाजी नगर येथे सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत वसमत येथे 150 एकरवर औद्योगिक वसाहत निर्मितीसाठी मंजूरी दिली. या वसाहतीमुळे तालुक्यातील 5 हजार तरूणांच्या हातांना रोजगार मिळणार असून 500 उद्योजक तयार होणार आहेत. एमआयडीसीसाठी उद्योग मंत्र्यांनी वेग द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शेतकर्यांना विजेची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे टाकळखोपा, पोटा, मुडी, आसेगाव, जवळा बाजार येथे मंजूर असलेले 33 के.व्ही. तात्काळ पुर्ण करण्यात यावेत, अशी मागणी लावून धरली. तसेच वेगवेगळ्या समाजासाठी महाज्योती, बार्टी, सारथीची स्थापना करण्यात आली आहे. तशीच मुस्लिम अल्पसंख्यांक समाजासाठी मार्टीची स्थापना करून मुस्लिम समाजातील युवकांना शिक्षणासाठी सवलत द्यावी, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.
धनगर समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवाव्यात, मेंढपाळांसाठी चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावेत, वसमत विधानसभा मतदार संघातील एका गावातील तरूण मेंढपाळाच्या 30 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. त्या युवकास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ मदत करावी अशी मागणी देखील आ. नवघरे यांनी केली.