

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : एका कथित महिलेचे शोषण करण्यात सोलापूर जिल्ह्यातील काही आमदार आणि काही खासदार सहभागी असल्याचा आरोप प्रसारमाध्यमांसमोर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आ. भास्कर जाधव यांनी केला. यावेळी त्यांनी नजरचुकीने आमदार विजयकुमार देशमुख हेही त्यामध्ये सहभागी असल्याचा उल्लेख केला. यानंतर आमदार विजयराव देशमुख यांनी जाधव यांनी या प्रकरणाचा खुलासा करावा अशी मागणी विधानपरिषदेत केली आहे.
कथित महिलेच्या शोषण प्रकरणात आमदार विजयकुमार देशमुख यांचा काडीमात्र संबंध नाही तरीही भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमासमोर बोलताना सोलापूर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचा कथित महिला शोषण प्रकरणात सहभाग असल्याचे प्रसार माध्यमांसमोर सांगितले.
त्यांच्या या वक्तव्याची आमदार विजयकुमार देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेत विधिमंडळाच्या अधिवेशनात बोलताना भास्कर जाधव यांनी विनाकारण कथित महिला शोषण प्रसंगात आपले नाव घेतले आहे. यामुळे माझी व्यक्तिगत बदनामी झाली आहे. भास्कर जाधव यांनी संबंधित प्रसारमाध्यमांसमोर जाऊन पुन्हा एकदा या प्रकरणाचा खुलासा करावा अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. यावर आता भास्कर जाधव यांच्या बाबतीत विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.