

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला नक्की जाऊ. आम्ही रस्त्यानं चालताना 22 तारखेला राम मंदिराचा आनंद साजरा करू असे आश्वासन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिले. अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे आश्वासन दिले होते.
मंत्री शंभुराजे देसाई यांनी मला पत्र पाठवून मुंबईत होणाऱ्या आरक्षणांबाबतच्या बैठकांना बोलावले आहे. पण मी या बैठकांना जाणार नाही. मुंबईत ४ ते ५ मॅरेथॉन बैठका होणार असून ओबीसीतून मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीकडे केली आहे. सरकारनेच उद्याच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घ्यावा अणि आम्हाला काय निर्णय घेतला याबाबत माहिती द्यावा असेही जरांगे पाटील म्हणाले.
२० जानेवारीपर्यत राज्य सरकारला चर्चेची दारं खुले असून अंतरवालीतून आम्ही पाय बाहेर टाकला की सरकारसाठी चर्चेची दारं बंद होतील नंतर चर्चा नाही असेही ते म्हणाले. आंदोलनात हसू होईल असे कृत्य एकाही मराठ्याने आंदोलनात करू नये,फक्त शांत होऊन आंदोलनात बसा असेही ते म्हणाले.
आम्हाला आडवल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती सह मुंबईतील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई आणि नागपूरच्या दारात जाऊन बसणार असल्याचा ईशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आता मराठा हे कुणबी असल्याचे ट्रकभर पुरावे सापडले मग आरक्षणात देण्यात अडचण काय आहे? मराठयांनी तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
१३ जानेवारीला ओबीसींची बीडमध्ये सभा होणार आहे यावर बोलताना ते म्हणाले की,भुजबळ तुमचा राजकारणासाठी वापर करतोय. आमच्या नोंदी ओबीसींमध्ये सापडल्या आहेत. आम्हाला तिथेच आरक्षण हवंय,त्याचे ऐकून फुकटचं भांडण विकत घेऊ नका,तो इकडे सभेत लोक दाखवतो आणि त्याच्यावरील केसेस मागे घेतो अशी टीकाही जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर केली.आभाळ आलं की तो फिरतो त्याला निबार गोळी द्या असा टोला जरांगे पाटील यांनी सरकार आणि भुजबळ यांना मारला.