

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले. मात्र या यादीत तुर्तास महाराष्ट्राला स्थान मिळालेले नाही. स्थान मिळालेले राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या राज्यांचा समावेश आहे.
आजवर महाराष्ट्राला १४ वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पारितोषिक मिळाले आहे. यात ७ वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिले, ४ वेळा दुसरे आणि २ वेळा तृतीय पारितोषिक मिळाले आहे. तर एकदा लोकप्रिय चित्ररथ या श्रेणातही पहिले पारितोषिक मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे सलग ३ वर्ष सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पारितोषिक पटकविण्याचा विक्रमही महाराष्ट्राच्या नावावर आहे. अशातच या वर्षी या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान मिळालेले नसल्याने या विषयाची चर्चा होत आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात चित्ररथ निवडण्याबाबत होणारे राजकीय वाद आणि राज्यांकडून दर वर्षी येणाऱ्या तक्रारी पाहता, प्रत्येक राज्याला तीन वर्षांतून एकदा तरी चित्ररथ सादर करण्याची संधी मिळेल, असा नियम संरक्षण मंत्रालयाने या वर्षी केला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या तज्ज्ञांच्या समितीच्या पसंतीला चित्ररथ उतरला पाहिजे, हीदेखील नियमाची आणखी एक अट आहे.