शेळी बांधण्यावरून वाद; भिंतीवर डोके आपटून तरुणाचा खून
यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : घराच्या भिंतीवर डोके आपटून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास येथील आर्णी तालुक्यातील दाभडी रोडवरील संभाजीनगरात घडली. बादल केशव टाले (वय २१, रा. संभाजीनगर, आर्णी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Yavatmal Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, बादल टाले व घराजवळच राहणाऱ्या दोन तरुणांमध्ये शेळी बांधण्यावरून दुपारी वाद झाला होता. रात्री संभाजीनगरातील गणेश मंडळाजवळ अन्नदानाचा कार्यक्रम सुरू असताना त्यांच्यातील वाद उफाळून आला. बादल याला दोघांनी घराजवळ असलेल्या बोळीत नेले. त्या ठिकाणी त्याचे एकाने भिंतीवर वारंवार डोके आपटले. तर दुसऱ्याने मारहाण केली. या प्रकारात गंभीर होऊन बादल याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच आर्णी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आकाश दोडफोडे व कन्हैया वाघमारे (रा. संभाजीनगर, आर्णी) या तरुणांना ताब्यात घेतले. (Yavatmal Crime News)