

यवतमाळ : अंगणवाडी मदतनीस पदावर निवड करण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच मागून पाच हजारांची रक्कम स्वीकारणाऱ्या प्रभारी महिला बालविकास अधिकाऱ्याला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवार २२ जुलैला सायंकाळी करण्यात आली.
पर्यवेक्षिका तथा अतिरिक्त बालविकास प्रकल्प अधिकारी शकुंतला जयवंत इंगोले (वय ५७) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार महिलेने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज दाखल केला होता. संबंधित पदावर निवड करण्यासाठी महिला अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे अर्जदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
एसीबी पथकाच्या पडताळणी कारवाईमध्ये महिला अधिकाऱ्याने तक्रारदारास अंगणवाडी मदतनीस पदावर निवड करण्यासाठी तडजोडीअंती प्रथम हप्ता म्हणून पाच हजार व काम झाल्यानंतर पाच हजार, अशी दहा हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच प्रथम पाच हजारांचा हप्ता स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने सापळा रचून महिला अधिकाऱ्याला महागाव येथील राहत्या घरी स्वयंपाकघरात तक्रारदाराकडून पाच हजाराची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.