

Yavatmal News
यवतमाळ : मुलगी युपीएससीत उत्तीर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करीत असताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाल्याने निवडीच्या आनंदोत्सवावर दुःखाचे सावट पसरले आहे.
पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी व महागाव तालुक्यातील यागद (ईजारा) येथील भुमिपुत्र प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. आयएएस अधिकारी बनल्याचा आनंदोत्सव खंदारे परिवाराकडून मोठ्या उत्साहात साजरा केल्या जात होता. तो आनंद आपल्या गावातील नातेवाईक व गावकऱ्यांसोबत साजरा केला पाहिजे यासाठी खंदारे परिवाराने शनिवार दि. २९ एप्रिल रोजी आपल्या मुळगावी येवून पेढे वाटून मुलीच्या निवडीचा आनंद साजरा केला.
परंतु, हा आनंद नियतीला पहावला गेला नाही. त्यांना शनिवारी रात्री अडीच वाजताच्या दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नातेवाईकांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मुलीच्या निवडीचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या खंदारे परिवारावर चारच दिवसात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रल्हाद खंदारे यांच्या अकस्मात जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी प्रमिला, मुंबई जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश असलेले पुत्र विक्रांत, नव्यानेच आयएएस निवड झालेली मुलगी मोहिनी, स्नुषा स्वाती व बराच मोठा आप्त परिवार आहे.