

यवतमाळ : आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला तब्बल दीड हजार क्विंटल गहू पावसात भिजल्याने संतप्त शेतकर्यांनी बाजार समिती प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. व्यापार्यांचा माल शेडमध्ये सुरक्षित ठेवला जातो, मग शेतकर्यांचा माल उघड्यावर का टाकता, असा संतप्त सवाल करीत शेतकर्यांनी बाजार समिती सचिवांना धारेवर धरले.
आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्यातून दोन दिवस गव्हाचा लिलाव केला जातो. आज मंगळवारी लिलाव असल्याने परिसरातील शेतकर्यांनी अंदाजे तीन हजार क्विंटल गहू विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता. यातील काही गहू शेडमध्ये ठेवण्यात आला असला तरी मोठ्या प्रमाणातील गहू उघड्यावरच पडून होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही क्षणांतच शेतकर्यांचा गहू भिजू लागला.
जीवाचे रान करून, कर्ज काढून आणि रक्ताचे पाणी करून पिकविलेला गहू डोळ्यांसमोर पावसात भिजताना पाहून अनेक शेतकरी हतबल झाले. काहींच्या डोळ्यात अश्रू तरळले. घटनेनंतर संतप्त शेतकर्यांनी एकत्र येत बाजार समितीचे सचिव विशाल राठोड यांना जाब विचारला. व्यापार्यांचा माल सुरक्षित शेडमध्ये आणि शेतकर्यांचा माल बाहेर ठेवून हा दुजाभाव का, आमच्या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल शेतकर्यांनी केला.
अवकाळी पावसामुळे बाजार समिती परिसरात एकच धावपळ उडाली. गहू झाकण्यासाठी शेतकरी ताडपत्री, पोते आणि प्लास्टिक घेऊन धावताना दिसले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यंदा नापिकी, अतिवृष्टी आणि सततच्या आर्थिक संकटामुळे शेतकरी आधीच खचला आहे. त्यात आता बाजार समितीतील निष्काळजीपणामुळे विक्रीसाठी आणलेले धान्यही पावसात भिजल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेतकर्यांनी जगायचं तरी कसं, असा संतप्त सवाल अनेकांनी उपस्थित केला.
बाजार समीतीत अंदाजे तीन हजार क्विटंल गव्हाची आवक होती. त्यापैकी शेडमधील पंधराशे क्विंटल गव्हाचा लिलाव झाला. उर्वरीत पंधराशे क्विटल गहू हा शेडबाहेर होता तो अवकाळी पावसाने भिजला. भिजलेला हा गहू अडते पोत्यात भरुन ठेवणार आहेत. उर्वरीत गव्हाचा लिलाव बुधवारी करण्यात येईल.
-विशाल राठोड, सचिव, बाजार समिती