

Yavtmal unseasonal rain | शुक्रवारी मध्यरात्री अचानक आलेल्या चक्रीवादळासह अवकाळी पावसाने नेर तालुक्याला झोडपून काढले. यात तालुक्यातील पिंपळगाव पळगाव (डुब्बा) येथे पोल्ट्री फार्ममधील दोन हजार कोंबड्या दगावल्या असून, पिंपळगाव काळे शिवारात बागायती शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
पिंपळगाव डुब्बा येथील शेतकरी लक्ष्मण खांदवे यांच्या शेतात पोल्ट्री फार्म आहे. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या चक्रीवादळामुळे या पोल्ट्री फार्मचे शेड कोसळले. यावेळी सुमारे दोन हजार जागीच मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे.
दुसरीकडे, पिंपळगाव काळे येथील शेतकरी अविन तिघरकर यांच्या बागायती शेतीला फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या शेतातील पपई, केळी आणि लिंबू यांसारखी फळझाडे उन्मळून पडली आहेत. या नैसर्गिक आपत्तीत तिघरकर यांचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या उन्हाळी मुगाचे पीकही या पावसामुळे मातीमोल झाले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये या अवकाळी पावसामुळे घरांची पडझड आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्रशासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.