

यवतमाळ : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिग्रस तालुक्यात महिलेचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाला आहे. पाच घरांची पडझड झाली असून, १८२ हेक्टरवरील ज्वारी, फळबाग, तीळ आदी पिकांना फटका बसला आहे.
जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून, गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने रात्रीच्या सुमारास वादळ वारा, विजांचा कडकडाटात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यातील पुसद, यवतमाळ, आर्णी, दारव्हा, दिग्रस, कळंब तालुक्यात वादळी वार्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान केले.
दिग्रस तालुक्यातील रोहिदास पवार आणि सुमन पवार शेतशिवारात काम करीत असताना वीज कोसळली. यामध्ये सुमन पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर रोहिदास पवार गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबत वादळामुळे दारव्हा तालुक्यातील चार, तर वीज कोसळल्याने कळंबमधील एका घराची पडझड झाली. तर दारव्हा तालुक्यात कोसळलेल्या वादळी वार्यामुळे १६५ हेक्टरवरील ज्वारी, तीळ, फळबागांना फटका बसला. यासोबत यवतमाळ, आर्णी प्रत्येकी एक, पुसद पाच, दिग्रस दोन, कळंब तालुक्यातील आठ, असे मिळून १८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहे. तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांमधून केल्या जात आहे.