

यवतमाळ : पारधी बेड्यावर राहणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींचा पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. रविवार (दि. १४) बाभूळगाव तालुक्यातील आसेगाव देवी येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हासुली नागुशेठ भोसले (वय-2.5 वर्षे), शाहिना घुग्गुशेठ भोसले (वय 3वर्षे) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. आसेगाव देवी गावालाच लागू पारधी बेडा आहे. स्मशानभूमी परिसरात मुरूम उत्खनन आणि इतर कारणातून खड्डे पडले आहेत. सततच्या पावसाने सदर खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. हासुली आणि शाहिना या दोन मुली खेळत-खेळत खड्ड्याजवळ गेल्या. दरम्यान दोघीही खड्ड्यात पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी मुलींना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, दोन्ही मुलींचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच सरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतचा अहवाल बाभूळगाव तहसीलदारांकडे सादर केला आहे.