

पाणी भरताना महिलेला मोटरचा शॉक
यवतममाळ :
ढाणकी येथील पाणीटंचाई दिवसेंनदिवस तीव्र होत आहे. शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी तुडुंब असतानाही पाणीटंचाईची समस्या कायम आहे. नळाला सध्या १५ दिवसाआड पाणी येत असल्याने पाणी साठवून ठेवण्याची धडपड करावी लागते. याच धडपडीने पाणी भरताना विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी घडली.
वर्षा अनंता डांगे (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे. नळाला पाण्याचा दाब कमी असल्याने त्यावर मोटर लावून त्या पाणी भरत होत्या. पाणी भरत असताना अचानक ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी धाव घेतली, तेव्हा वर्षा डांगे नळाच्या विद्युत मोटरीजवळ पडून होत्या. नागरिकांनी वीज प्रवाह बंद करून लगेच त्यांना रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. वर्षा डांगे या आशा सेविका म्हणून ढाणकी आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन लहान मुले आहेत. बिटरगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर अन्नमवार, जमादार मोहन चाटे, सुदर्शन जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली.
खेकडे पकडण्यास गेलेल्या युवकास विजेचा धक्का
दुसऱ्या एका घटनेत खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय युवकाला शेतातील कुंपणाला सोडलेल्या जीवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जागीच प्राण गमवावे लागले. ही हृदयद्रावक घटना दि. ३१ ऑक्टोबरच्या रात्री पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत राजापेठ शेत शिवारात घडली.
घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील रहिवासी मंगेश भाऊराव नैताम (वय २८) असे मृत युवकाचे नाव आहे. मंगेश आपल्या काही साथीदारांसोबत खेकडे पकडण्यासाठी गेला होता. खेकडे पकडून घरी परत येत असताना राजापेठ शेत शिवारात नागेश विठ्ठल रावते यांनी मकत्याने केलेल्या शेतातील कुंपणाला सोडलेल्या जीवंत विद्युत तारेचा त्याला जोरदार धक्का बसला. यात मंगेशचा जागीच मृत्यू झाला. घडलेला प्रकार लक्षात येताच आरोपी नागेश रावते याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शेतातील विद्युत तार गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मृतक मंगेशचा भाऊ सुदर्शन नैताम यांनी आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी नागेश रावते विरोधात गुन्हा नोंद केला आहे.