

यवतमाळ : जिल्ह्यात घरफोडी, चोरीच्या घटनेत कमालीची वाढ झाली असून गुरूवारी सायंकाळी चोरट्यांनी चक्क गॅस गोदाम फोडून ५२५ सिलेंडर लंपास केले. ही धक्कादायक घटना दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथे घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांसह एलसीबी पथक सिसिटिव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.
या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथून ५०० मीटर अंतरावर गुरूमाऊली गॅस एजन्सीचे सिलेंडर गोदाम आहे. या गोदामातून बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी गोदामाचे शटर तोडून ५२५ सिलेंडर किंमत १३ लाख १३ हजार ७८४ रुपयांचा मुद्देमाल लंपास केले आहे.
गुरूवारी सकाळी ही चोरीची घटना उघडकीस येताच दारव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. हा प्रकार परिसरातील सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सिलेंडर घेवून जाणारा ट्रकचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. या प्रकरणी अमोल प्रकाश ठाकरे (वय ४५) रा. बोदेगाव ता. दारव्हा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे.