

यवतमाळ: पुढारी वृत्तसेवा: नव्या संचमान्यतेनुसार प्राथमिक शाळेतील हजारो शिक्षक अतिरिक्त होत आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात संताप व्यक्त होत आहे. संचमान्यतेचा नव्याने काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी शिक्षक महासंघाच्या समन्वय वतीने आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांना निवेदन देण्यात आले. (Teachers Union Agitation)
यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करण्यात याव्या. संच मान्यतेचा अन्यायकारक निर्णय रद्द करावा. जिल्हास्तरावरील शिक्षकांच्या विविध समस्या निकाली काढण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अवगत करून निर्देश देतो, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे संच मान्यतेचा अन्यायकारक निर्णय शासनस्तरावर फेरविचार करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. अशोक उईके यांनी दिले. (Teachers Union News)
अन्यायकारक संच मान्यतेनुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ६ वी ते ८ वीच्या वर्गाना शून्य शिक्षक दाखविले आहे. त्यामुळे या वर्गांना अध्यापन करणारे विषय शिक्षक अतिरिक्त होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी शिक्षक समन्वय महासंघाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
यावेळी किरण मानकर, आसाराम चव्हाण, महेंद्र वेरूळकर, नीळकंठ कुळसंगे, सारंग भटुरकर, तुषार आत्राम, शरद घारोड, पुंडलिक बुटले, सुनील राठोड, नरेश खरतडे, नदीम पटेल, प्रकाश सालपे, मोहम्मद रफीक, श्याम पहुरकर, पुंडलीक रेकलवार, राजेश उदार, युवराज पत्रे, स्वप्निल फुलमाळी, विनोद खरुलकर, कुलदीप डंभारे, लक्ष्मीप्रसाद वाघमोडे, राजहंस मेंढे, देवीचंद मेश्राम, नागोराव कोंपलवार, मनीष लढ़ी, सहदेव चहांदे उपस्थित होते.