

यवतमाळ : शेतकऱ्यांना १०० टक्के हमी देऊन निकृष्ट आणि अप्रमाणित सोयाबीन बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी ‘बूस्टर प्लँट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ (गेवराई बाजार, ता. बदनापूर, जि. जालना) या कंपनीविरुद्ध बाभूळगाव पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बनावट व निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
जालना जिल्ह्यातील ‘बूस्टर प्लँट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री केली होती. या बियाण्यांच्या पाकिटांवर ‘बेस्ट क्वालिटी गॅरंटीड, १०० टक्के सर्टिफिकेशन’ असा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. या दाव्यावर विश्वास ठेवून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी हे बियाणे खरेदी करून त्याची पेरणी केली. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खते आणि पाणीसुद्धा दिले; परंतु पेरणीनंतर अनेक दिवस उलटूनही बियाण्यांची उगवणच झाली नाही.
बियाणे न उगवल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आणि त्यांची चिंता वाढली. शेवटी संतप्त शेतकऱ्यांनी याप्रकरणी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत कृषी विभागाने संबंधित बियाण्यांचे नमुने गोळा करून ते नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.
प्रयोगशाळेच्या अहवालात हे बियाणे पूर्णपणे 'निकृष्ट आणि अप्रमाणित' असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, या बियाण्यांचे उत्पादन, पॅकिंग आणि सीलिंग यासाठी आवश्यक असणारे शासकीय प्रमाणीकरण न घेताच, ते प्रमाणित असल्याचा खोटा भास निर्माण करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, बाभूळगाव पंचायत समितीचे बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी दत्तात्रय विठ्ठलराव तमलवाड यांनी मंगळवारी बाभूळगाव पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कंपनीविरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी केले असल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रोहित गंगाधर बेम्ब्रे करत आहेत.
"जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित बियाण्यांवर अवलंबून असते. ‘बूस्टर प्लँट जेनेटिक्स’ कंपनीवर झालेली ही कारवाई अप्रमाणित बियाणे विकणाऱ्या इतर कंपन्यांसाठी एक कडक इशारा आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खते व बियाण्यांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली असून, कुठेही गैरप्रकार किंवा काळाबाजार आढळून आल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील."
विकास मीना (जिल्हाधिकारी, यवतमाळ)