

यवतमाळ : शहरातील धामणगाव मार्गावर मोहा फाट्याच्या पुढे भरधाव दुचाकी अनियंत्रित झाली. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर जोरात आदळली. यात दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजता घडली.मंगेश फकिरा मेश्राम (वय २६), रामरावजी तुकाराम उमरे (वय ६०) दोघे रा. पहूर पुनर्वसन, ता. बाभूळगाव अशी मृतांची नावे आहे.
हे दोघे एमएच-२९- बीयू-३९६९ क्रमांकाच्या दुचाकीने यवतमाळवरून बाभूळगावकडे जात होते. दरम्यान, मोहा फाट्याच्या पुढे एमएच-२९-एके-६५३४ क्रमांकाचा विटा भरलेला ट्रॅक्टर, टायर फुटल्याने उभा होता. दुचाकीस्वाराला वेगावर नियंत्रण ठेवता आले नाही. दुचाकी थेट ट्रॅक्टर ट्रॉलीवर जाऊन आदळली. दोघांनाही ट्रॉलीचा मार लागल्याने गंभीर जखमी झाले. शहर पोलिसांनी दोन्ही जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक गणपत काळुसे यांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई केली.
भरधाव दुचाकी थेट निंबाच्या झाडावर आदळून तेजस पुंजाराम सोयाम (वय २०) आणि शिवानी संजय सुरपाम (वय १९ रा. मलापुर ता. बाभुळगाव)या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. बाभुळगाव तालुक्यातील खडकसावंगा ते बेंबळा धरण मार्गावर १५ नोव्हेंम्बरला दुपारी ही घटना घडली होती. दोन्ही घटनेतील मृतक हे बाभुळगाव तालुक्यातील आहे.