

यवतमाळ : जमिनीच्या वादातून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील बेलोरी येथे घडली आहे. केवळ तीन एकर शेती नावावर करून देत नाही, या रागातून एका नराधमाने शेतमालकाचा पाठलाग करून त्यांचा दगडाने ठेचून खून केला आणि त्यानंतर प्रेत शेतात फेकून दिले. याप्रकरणी वडगाव जंगल पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.
श्रीराम लक्ष्मण सुरपाम (वय ५०, रा. बेलोरी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आरोपी संभा धर्माजी गाडेकर (वय ४८) याचा श्रीराम यांच्या मालकीच्या तीन एकर शेतीवर डोळा होता. ही शेती आपल्या नावावर करण्यासाठी तो वारंवार श्रीराम यांच्याशी वाद घालत असे.
सोमवारी सायंकाळी आरोपी संभा हा श्रीराम यांच्या घरी गेला होता. श्रीराम गणेशपूरला गेल्याचे कळताच तो त्यांचा शोध घेण्यासाठी निघाला. वाटेत गाठ पडताच आरोपीने श्रीराम यांचा पाठलाग केला आणि दगडाने बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. क्रूरतेची सीमा ओलांडत आरोपीने मृतदेह ओढत नेऊन शेतातील तुरीच्या ओळींमध्ये फेकून दिला.
मंगळवारी सकाळी श्रीराम यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा पुतण्या विनोद याला दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. वडगाव जंगल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास दंडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाची अवस्था पाहून उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला.
मृतक श्रीराम यांच्या पत्नी वनिता सुरपाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि आरोपी संभा गाडेकर याला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोकडे करत आहेत.