

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ शहरापासून दोन किलोमीटरवर असलेल्या एका इंग्लीश मेडियम स्कुलची बस पोफाळी परिसरातील गावामधून विद्यार्थ्यांना घेऊन येत होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेच्या झाडावर जावून धडकली. यात बस पलटी झाल्याने बसमधील एका १५ वर्षीय विद्यार्थीनी जागीच ठार झाली. ही दुर्दैवी घटना आज (दि.२५) सकाळी ८ वाजता दरम्यान पळशी फाटा व कुपटी गावादरम्यान असलेल्या गारवा हॉटेलजवळ घडली. घटना घडल्यानंतर बसचा चालक हा घटनास्थळावरून पसार झाल्यामुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
महिमा अप्पाराव सरकटे (वय १५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. दररोज दहांगाव येथील स्टुडंट वेलफेअर इंग्लीश मिडियम स्कूलची बस (एमएच २९ एम ८४८८) ही पोफाळी परिसरातील कळमुळा, दिवट पिपरी, हातला, पोफाळी आदी गावातील विद्याध्यांना घेवून निघाली होती. पळशी फाट्यासमोर असलेल्या हॉटेल गारवाजवळ चालक प्रशांत उर्फ प्रकाश गाडगे रा. हातला याने बस भरधाव वेगाने चालवित असताना बसमधील ३० ते ४० लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांपैकी मृत महिमा ही खिडकीतून बाहेर रस्त्यावर फेकल्या गेल्याने डोक्याला जबर मार लागला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
घटना अचानक घडल्याने सर्व लहान विद्यार्थ्यांनी आरडाओरड करीत किंचाळ्या फोडल्या. यावेळी चालक प्रशांत याने महिमाचा मृत्यू झाल्याचे पाहून घटनास्थळावरून पळ काढला. रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी सर्व जखमी मुलांना उमरखेड शासकिय रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना घरी नेले असून केवळ एका विद्यार्थ्यांला डॉक्टरांनी नांदेड येथे रेफर केले आहे.
दरम्यान घटनेची माहिती शहरात पसरताच उपजिल्हा रुग्णालयात बघ्यांची गर्दी उसळली होती. दरम्यान जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश त्वरीत दिल्याने आरटीओचे पथक पोफाळी पोलिस ठाण्यात पोहचले असून वाहनासंबंधीची चौकशी करण्यात येत आहे.
स्कुल बसच्या या अपघातात मृत महिमा ही अप्पाराव सरकटे यांची एकुलती एक मुलगी होती. विशेष म्हणजे लग्नानंतर तब्बल १२ वर्षानंतर तिचा जन्म झाला होता. मात्र, नियतीने तिला आज हिरावून नेले. अशी चर्चा रुग्णालयासमोर सुरु असतांना अनेकांना अश्रु अनावर झाले होते.