

यवतमाळ : विनापरवाना रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने चौकशीसाठी गेलेल्या पोलिस पाटील व कोतवालाच्या दुचाकीवर ट्रॅक्टर चढवून जीवघेणा हल्ला केला. ही घटना मारेगाव तालुक्यातील कोसारा रेती घाटावर सोमवारी घडली. यात पोलिस पाटील व कोतवाल गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वर्धा नदीवरील कोसारा घाटावरून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तलाठी प्रवीण उपाध्ये यांना मिळाली. त्यांनी याची माहिती गावातील कोतवाल दिलीप पचारे यांना देऊन पोलिस पाटील प्रेमदास गाणार यांना 'सोबत घेऊन तुम्ही समोर जा, मी लवकरच पोहचतो' असे सांगितले. यावरून पोलिस पाटील व कोतवाल मोटारसायकलने घाटाकडे निघाले. यावेळी लाल रंगाचे एक ट्रॅक्टर समोर होते, तर त्यामागून आणखी चार ट्रॅक्टर येताना दिसले.
संबंधित ट्रैक्टर चालकाला ट्रॅक्टर थांबविण्यास सांगताच, ट्रॅक्टर चालकाने कारवाईच्या भीतीने त्यांच्या दुचाकीवर चढविले. यात पोलिस पाटील प्रेमदास गाणार व कोतवाल दिलीप पचारे गंभीर जखमी झाले, तर मोटारसायकल अक्षरशा चकनाचूर झाली. पुन्हा कोणी आडवे आल्यास त्यांचाही बंदोबस्त लावतो, अशी धमकी देऊन ट्रॅक्टर चालक पळून गेले. थोड्याच वेळाने तलाठी प्रवीण उपाध्ये घटनास्थळी पोहोचताच, पोलिस पाटील बेशुद्ध अवस्थेत तर कोतवाल जखमी अवस्थेत आढळून आले. तलाठी उपाध्ये यांनी कोसारा येथील नागरिकांची मदत घेऊन दोन्ही जखमींना तत्काळ वणी येथे उपचारासाठी हलविले. या प्रकरणाची तक्रार मारेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली.