यवतमाळ : पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी घेतलेल्या अचानक भेटीदरम्यान एक 'बीएलओ' (बूथ लेव्हल ऑफिसर) मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक तपासणीत संबंधित बीएलओने गेल्या ११ दिवसांपासून मतदारांची कोणतीही माहिती ऑनलाईन अपलोड केली नसल्याचेही उघड झाले आहे.
गजानन श्रीराम राठोड असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, तो पुसद तालुक्यातील मोहा येथे 'बीएलओ' म्हणून कार्यरत आहे. राठोड हा मूळचा पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीत कनिष्ठ लिपिक आहे. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी प्रक्रियेला गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या असताना, या कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण कामकाजावर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे.
९ जुलै रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी मतदार नोंदणी केंद्राची अचानक पाहणी केली. यावेळी बीएलओ गजानन राठोड याची वर्तणूक संशयास्पद वाटल्याने प्रशासनाने तातडीने त्याची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत त्याने मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि राष्ट्रीय कर्तव्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा आणि गैरवर्तन समोर आल्याने प्रशासनाने ही बाब कमालीची गांभीर्याने घेतली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत संबंधित बीएलओला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्याचा खुलासा मागवण्यात आला आहे. त्याच्यावर लवकरच कडक शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच, निवडणूक कामात कोणत्याही कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.