यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील वडकी येथील स्थिर तपासणी नाक्यावर वाहन तपासणीदरम्यान पोलिसांनी एका कंटेनरमधून तब्बल ५४ रेड्यांची सुटका केली. ही कारवाई शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कारेगाव जवळच्या स्थिर तपासणी नाक्यावर प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. शनिवारी रात्री नागपूरकडून हैदराबादकडे जाणाऱ्या एचआर ५५-वाय ३१७७ या क्रमांकाच्या कंटेनरची वडकी पोलिसांनी तपासणी केली. त्यात तब्बल ५४ रेडे आढळून आले.
या प्रकरणी असगर रशिद (वय४२) व त्याचा साथीदार मोरमल ईशाक (वय ४५) दोघेही रा.घसेरा, जिल्हा मेवात (हरयाणा) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या कारवाईत चार लाख ४० हजार रुपये किमतीचे ५४ रेडे, ३० लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण ३४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुटका करण्यात आलेल्या रेड्यांना वणी तालुक्यातील रासा येथील गोरक्षणाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई वडकी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुखदेव भोरकडे आदींनी पार पाडली.