

यवतमाळ : नाल्याच्या काठावर अंत्यसंस्कार सुरू असताना मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मृतदेहाला भडाग्नी देऊन नागरिक परत निघाले. या दरम्यान नाल्याला पूर आल्याने अर्धवट जळलेला मृतदेह वाहून गेला. मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (पिसगाव) येथे ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली.
कौशल्या महादेव कोंडेकर (वय ५५) या महिलेचा दि. १३ सप्टेंबर रोजी आजारपणामुळे मृत्यू झाला. स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी नाल्याच्या काठावर करण्यात आले. अंत्यविधी सुरू असताना विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे अंत्यसंस्काराला उपस्थित असलेले नातेवाईक घाईने घरी परतले आणि त्यानंतर नाल्याच्या पुरात मृतदेह वाहून गेला. जवळपास दीड ते दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे ओढ्याला पूर आला. पुराच्या पाण्यात जळणारा मृतदेह वाहून गेल्याचे काहींनी बघितले. पाऊस थांबल्यावर नातेवाईकांनी रात्री उशीरापर्यंत व रविवारी सकाळी शोध घेतला. मात्र, मृतदेह कुठेही आढळून आला नाही. या बाबत पोलिस पाटील राजेंद्र फरताडे यांनी तालुका प्रशासनाला माहिती दिली. तालुका प्रशासन आणि नातेवाईक अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा शोध घेत आहे.
पांढरकवडा या गावात स्मशानभूमिसाठी शासकीय जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही भौतिक सुविधा पुरविता आल्या नाही. नागरिकांना जागा देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, जागेचा प्रश्न अद्यापही कायम आहे. गावकरी गावा शेजारील नाल्याच्या काठावर अनेक वर्षांपासून अंत्यसंस्कार करतात. त्या दिवशी अचानक मोठा पाऊस आल्याने अर्धवट जळालेला मृतदेह वाहून गेला.
उत्तम नीलावाड, तहसीलदार, मारेगाव