

यवतमाळ : मोबाईल घेऊन देण्यास पालकांनी नकार दिल्याने घाटंजी तालुक्यातील १५ वर्षीय मुलाने घर सोडून दारव्हा गाठल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत मुलाचा शोध लावला.
चौकशीमध्ये मुलाने, मला कोणीही पळवून नेले नाही, मोबाईल मिळत नसल्यामुळे मी स्वतःच घरातून निघून गेलो होतो, अशी कबुली दिली. या घटनेचा पुढील तपास घाटंजी पोलिस करीत आहेत. दरम्यान, तालुक्यातील हेटी तांडा येथील निलेश राठोड यांनी ७ मे रोजी आपल्या अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार घाटंजी पोलिस ठाण्यात दिली होती.
घटनेची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांनी तातडीने विशेष पथक नियुक्त करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संबंधित मुलगा दारव्हा येथील एकविरा हॉटेल परिसरात असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सुशील शर्मा, साजिद खान, राजू रणमले आणि शाम दवंडे यांनी तत्काळ दारव्हा येथे जाऊन मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले व आई-वडीलांच्या स्वाधीन केले.