

यवतमाळ : वणी येथील वेकोलीच्या मुंगोली-कोलगाव परिसरातील कोळसा खाण आणि प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या विविध समस्या तत्काळ सोडविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी कोलगाव चेकपोस्टजवळ रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी तब्बल नऊ तास कोळसा वाहतूक रोखून धरली. या आंदोलनामुळे चेकपोस्टच्या दोन्ही बाजूंना कोळसा वाहतूक करणारे शेकडो ट्रक अडकून पडले होते.
वेकोलीच्या कोळसा उत्खनन व वाहतुकीमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाढते प्रदूषण, पुनर्वसित गावांतील अपुऱ्या सुविधा, स्थानिक बेरोजगारांना रोजगारात प्राधान्य न मिळणे तसेच पायाभूत सुविधांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे येथील समस्या गंभीर बनल्या आहेत. यापूर्वी अनेकदा तक्रारी आणि निवेदने देऊनही प्रश्न निकाली न निघाल्याने शेवटी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.
कोलगाव चेकपोस्ट ते कोलगाव फाटा मार्गाची दुरुस्ती करणे.
कोलगाव पुनर्वसन ते जोडरस्ता मजबुतीकरण व खाण परिसरातील रस्त्यांचे खडीकरण करणे.
स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देणे.
शिवणी मार्गावरील पुलांचे पिचिंग करणे आणि पाणी फवाऱ्याद्वारे धूळ नियंत्रण करणे.
सुरक्षित पर्यायी रस्त्यांची निर्मिती, स्ट्रीटलाइटची व्यवस्था करणे तसेच पर्यावरणाला घातक ठरणारी विलायती (प्रोसोपिस) बाभळींचे निर्मूलन करणे.
नागरीक, विद्यार्थी, शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, असे निवेदन आधीच देण्यात आले होते. मात्र, वेकोली प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने नागरिकांनी अखेर आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी जि. प. सदस्य विजय पिदूरकर यांनी केले. वाहतूक रोखली जाताच शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर यांनी घटनास्थळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला.
यानंतर वेकोलीचे सहाय्यक प्रबंधक पी. एम. लोखंडे, मुंगोलीचे उपक्षेत्रीय प्रबंधक गौतम राय, पैनगंगाचे उपक्षेत्रीय प्रबंधक मनीष पोडे हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी विजय पिदूरकर, कोलगावचे सरपंच संदीप जेनेकर, साखराचे सरपंच निखिल उपासे, शिवणीचे सरपंच विश्वास बोरपे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. यानंतर परिसरातील कोळसा वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.