

यवतमाळः यवतमाळ येथे मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. भार्गव मधुकर झोडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता ८ वीमध्ये शिकत होता. सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता भार्गव शिकवणी वर्गाला जातो असे सांगून घरून निघाला. परंतु सायंकाळपर्यंत घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.
भार्गवची आई ज्ञानेश्वरी झोडे यांनी त्यांच्या भाऊ निलेश डोगरवार यांना माहिती दिली. निलेश यांनी लगेच चौकशी केली असता भार्गव व त्याचे मित्र खुनी नदीवरील धबधब्यावर पोहायला गेल्याचे समजले. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सोमवारी रात्री अंधारामुळे शोधकार्य करण्यात अडथळा आला. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता पोलीस व नातेवाईकांच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या शोध मोहिमेत भार्गवचा मृतदेह खुनी नदीच्या पाण्यात मिळाला. या घटनेने पांढरकवडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.