

Ner Murder Case
यवतमाळ : जनावरे चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्याची किरकोळ कारणावरून तिघांनी दगडाने हत्या केली. या प्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
नेर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या झोंबाडी येथील दिनेश राठोड यांचा मुलगा गोकुळ राठोड हा जनावरांना चराईसाठी घेऊन गेला होता. दुपारी तीन वाजता अचानक पाऊस आल्याने तो शेतात बाजूलाच असलेल्या आडोशाला थांबला. त्याचवेळी आरोपी जग्गु पवार, आकाश पवार, पुणेशाही पवार या तिघांनी त्याच्यावर दगडाने हल्ला चढविला. यात तो गंभीर जखमी झाला. जनावरे घेऊन तो परतला नसल्याने गावातीलच त्याच्या नातेवाईकांनी शोध मोहीम सुरू केली. तेव्हा गोकुळ राठोड हा सरकारी नर्सरीजवळ मृत अवस्थेत मिळाला. ही घटना दि. ६ ऑक्टोबर २०२२ रोजी घडली. दरम्यान या हत्याप्रकरणी नेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेतला.
यात जग्गू पवार, आकाश पवार, पुणेशाही पवार यांनी मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. यावरून तपास अधिकारी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश हिरुळकर यांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि आरोपपत्र न्यायलयात सादर केले. संबंधित खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांच्या न्यायालयात चालला. त्यांनी या खटल्यामध्ये एकूण दहा साक्षीदार तपासले. यात उमेश राठोड हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता त्याच्यासह इतर साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने हत्या केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
तसेच जग्गु पवार याला ८० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. आरोपी आकाश पवार यालाही जन्मठेपेसोबत ३० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नीती दवे यांनी काम पाहिले.