

यवतमाळ : दारूच्या नशेत अश्लील शिवीगाळ करणाऱ्याला समजाविण्यासाठी शेजारी व्यक्ती गेला असता, त्याच्यावर चाकूने वार करून हत्या केली. या गुन्ह्यातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.यु, बघेले यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
हुसेन पांडुरंग तापडू (४०, रा. नरसापूर, ता. कळंब) असे आरोपीचे नाव आहे. हुसेन हा दि. १३ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता घराच्या मागील बाजूला जोरजोराने अश्लील शिवीगाळ करीत होता. त्यावेळी प्रकाश विठ्ठल जांभुळकर हा शेजारी त्याला समजावून सांगण्यासाठी गेला. हुसेनने घरातून धारदार चाकू आणून प्रकाशच्या पोटात सपासप वार केले. यावेळी प्रकाशचे नातेवाईक त्याच्या मदतीला धावले असता हुसेन तेथून पळून जात घरात लपून बसला. जखमी प्रकाश जांभुळकर याला कळंब ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले हुसेन तापडू याच्या विरोधात कळंब पोलिस ठाण्यात अनिताने तक्रार दिली. त्यावरून कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार विजय राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने फिर्यादी अनिता कैलास जांभुळकर, डॉ. रवी पाटील, तपास अधिकारी यांची साक्ष घेण्यात आली. न्यायालयाने ही साक्ष ग्राह्य मानून हुसेन तापडू याला कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व २५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन वर्ष कारावासाची शिक्षा दिली. २५ हजार रुपयांची मदत मृताची पत्नी उर्मिला प्रकाश जांभुळकर हिला भरपाई म्हणून देण्याचा आदेश पारित केला. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. उदय के. पांडे यांनी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी विजय कुडमेथे यांनी सहकार्य केले.