

Life Imprisonment Sentence Yavatmal Court Verdict
यवतमाळ : सावत्र मुलाला विहिरीत ढकलून खून करणाऱ्या निर्दयी बापाला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच पाचशे रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. देविदास नामदेवराव कोडापे (वय ४१, रा. दाभा, ता. बाभूळगाव), असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, देविदास कोडापे याचा पत्नीसोबत वाद झाला होता. त्यानंतर आरोपीने मृत सावत्र मुलगा राहुल (वय सात) आणि दोन मुलीसह बाभूळगाव तालुक्यातील दाभा गाव गाठले. अशात एक जानेवारी २०२३ ला दुपारी दीड वाजताच्या सुमारास आरोपीने रागाच्या भरात सावत्र मुलगा राहुल याला काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत विहिरीत ढकलून दिले. यात राहुल याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आरोपीविरोधात बाभूळगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एम. बी. डांगे यांनी केला. प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने साक्षीदारांची साक्ष व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य मानून गुरुवार दि. १६ एप्रिल रोजी आरोपी देविदास कोडापे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
त्याचप्रमाणे पाचशे रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. नरेंद्र पांडे यांनी काम पाहिले. तर संजय कासार यांनी सहकार्य केले.