Yavatmal Bribe Case | यवतमाळ : चार लाखांची लाच घेताना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यास रंगेहाथ अटक!

अमरावती लाचलुचपत विभागाची कारवाई
Bribe News
Bribe News
Published on
Updated on

यवतमाळ :  भविष्यात २० लाखाच्या कामांचे देयके मिळवून देण्यासाठी 20 टक्के दराने चार लाख रुपये लाच स्वीकारताना विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई अमरावती लाचलुचपत विभागाच्या वतीने शुक्रवारी पुसद येथे करण्यात आली. 

जनार्दन चव्हाण (वय 57), असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. वीज वितरणाच्या पुसद उपविभागात ‘ब्रेकडाऊन‘ व ‘मेंटेनन्स‘ची 20 लाख रुपयांची एकूण नऊ कामे होती. या कामाची वर्कऑर्डर कंत्राटदाराला देण्यात आली होती. तत्पूर्वी देयके निकाली काढण्यासाठी कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण यांनी 20 टक्के प्रमाणे चार लाख रुपयांची मागणी केली.

पैसे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास विद्युत भवनच्या शासकीय निवासस्थानात स्वीकारण्याचे मान्य केले होते. या मागणीनंतर कंत्राटदाराने थेट अमरावती लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला असता आरोपी कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण यांना चार लाख रुपये घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी पुसद शहर पोलिस ठाण्यात कार्यकारी अभियंत्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, लाचलुचपत विभागाने आरोपीच्या घराची झाडाझडती घेतली. त्यात नेमकं काय सापडले हे कळू शकले नाही. ही कारवाई पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक राजेश राठोड, पोलिस उपअधीक्षक मंजूषा भोसले, पोलिस निरीक्षक रवींद्र सहारे, संजय शिंदे, अभय वाघ, वैभव जायले, मोहन ठाणेकर, राजेश बहिरट, उमेश बुजाडे, आदींनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news