

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा वीटभट्टीवरील महिला मजुराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना हिवरा दरणे येथे बुधवारी उघडकीस आली. दोन दिवसांपूर्वी महिलेचा पतीशी अपघातावरून वाद झाला होता. त्यामुळे पोलिसांना संशय होता. पीएम अहवालानंतर पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
सुंदराबाई रंजित मारको (वय २८, रा. चिकतलाई, ता. हरसूद, जि. खंडवा, मध्य प्रदेश) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कळंब पोलिसांनी पती रंजीत मांगीलाल मारको (वय २५) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पती-पत्नी हिवरा दरणे येथील सचिन दरणे यांच्या वीटभट्टीवर गत पाच महिन्यांपासून कामाला होते. तेथेच ते एका खोलीत राहायचे. दोन दिवसांपूर्वी दोघेही रेशन आणण्यासाठी हिवरा दरणे गावात गेले होते. रात्री ९ वाजता परत येताना दोघेही दुचाकीवरून खाली पडले. यात दोघेही किरकोळ जखमी झाले. दुचाकीवरून पाडल्याच्या कारणातून मंगळवारी (दि. २५) सायंकाळी महिलेने पतीशी वाद घातला, दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही झाले. एवढेच नाही, तर दोघांनीही परस्परांना मारहाण केली. पती रंजीत याने रागाच्या भरात पत्नीला ढकलून दिले. यामध्ये तिच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर पती रागाने खोलीच्या बाहेर झोपी गेला, तर महिला खोलीत झोपली.
बुधवारी सकाळी पतीने सुंदराबाईला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती निपचित पडली होती. रात्रीच्या घटनाक्रमाची माहिती रंजीत मारको याने कळंब पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंब ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अंपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंबंधी निर्देश दिले. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, हा खून असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे पोलिस पीएम अहवालाच्या प्रतीक्षेत होते. सदर अहवाल येताच महिलेचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे पुढे आले.