

उमरखेड : आज दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याचा तीन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास मात्र समृद्ध शेती, विकसित वस्ती आणि प्रगत जीवनशैलीची साक्ष देणारा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील पाचखेड येथे नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननातून लोहयुगीन वस्तीचे महत्त्वपूर्ण पुरावे समोर आले आहेत.
उत्खननात घरांचे अवशेष, लोखंडी वस्तू, मातीची भांडी, तांदळाचे दाणे तसेच इतर धान्यांचे पुरावे आढळले. या निष्कर्षांवरून सुमारे ३,००० वर्षांपूर्वी या भागात भात, गहू, तूर आणि मूग यांसारख्या पिकांची लागवड होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संशोधनातून आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. आज कमी पावसाचा प्रदेश मानला जाणारा यवतमाळ सातवाहन काळापर्यंत दमट हवामानाचा होता. त्यानंतर हवामानात झालेल्या बदलांमुळे पर्जन्यमान घटले आणि शेतीच्या पद्धतीतही बदल झाले.
उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून त्या काळातील लोक शेतीबरोबरच मासेमारी, शिकार आणि धातूकामातही पारंगत होते. नदीतील शंख-शिंपल्यांचा उपयोग करून चुना तयार केल्याचे पुरावेही या उत्खननात आढळले असून, त्या काळातील विकसित वसाहतीची साक्ष ते देतात.
पाचखेड येथील हा पुरातत्त्वीय शोध केवळ यवतमाळच नव्हे, तर विदर्भाच्या प्राचीन इतिहासाला नव्या दृष्टीने समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. भूतकाळातील समृद्ध संस्कृती, शेती आणि पर्यावरणाचा वेध घेणारा हा शोध इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.