

Ghatanji Attempt to Murder Case
यवतमाळ : ज्या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते, त्या तरुणीचे लग्न जुळले. ही बाब सहन न झाल्याने तरुणीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. एकतर्फी प्रेमातून तरुणीला गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीस जन्मठेप आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी मंगळवारी (दि.१७) हा निकाल दिला.
घाटंजी येथील चिंतामन कवडू पुसनाके (वय ३०) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे घाटंजी तालुक्यातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. अशातच तिचे लग्न जुळले. त्यामुळे ती तिच्या होणार्या पतीसोबत मोबाईलवर बोलत होती. २९ जानेवारी २०२१ रोजी कापूस वेचण्यासाठी तरुणी शेतात गेली होती. तेव्हा आरोपीने शेतशिवार गाठून तिच्या होणार्या पतीला मोबाईलवर धमकी दिली.
तसेच तू कशी काय लग्न करते, असे म्हणून तरुणीवर चाकूने तब्बल ११ वार केले होते. गंभीर अवस्थेत तरुणीला यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी तातडीने तिच्यावर उपचार करून पोटात अडकलेला चाकूचा तुकडा बाहेर काढला. त्यामुळे तिचा जीव वाचला.
या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी चिंतामन पुसनाके याच्याविरोधात गुन्हा नोंद करून अटक केली आणि प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणात दहा साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली.
पीडित मुलगी, तिची बहीण, डॉ. स्वप्नील मदनकर आणि तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक किशोर भुजाडे यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीला जन्मठेप आणि तीन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील अॅड. उदय पांडे यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणून सारिका बोधनकर यांनी सहकार्य केले.