Yavatmal Fraud : तलाठी भरतीचे बनावट नियुक्तीपत्र अन् २१ लाखांचा गंडा! यवतमाळमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाची मोठी फसवणूक

Yavatmal Fraud
Published on
Updated on

यवतमाळ : महसूल विभागात तलाठी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला बनावट नियुक्ती आदेश (ऑर्डर) देत तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब हरबक (वय ५५), रमेश हाके (वय ३०), सोळंकी (वय ५०), लोंढे (चौघेही रा. छत्रपती संभाजीनगर) आणि तुळशीराम जाधव (वय ४८, रा. दीपनगर, यवतमाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्णी तालुक्यातील चिंचवडी येथील रहिवासी असलेला वैभव कृष्ण राठोड (वय ३०) हा यवतमाळमध्ये राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. २०२३ मध्ये टीसीएस (TCS) कंपनीमार्फत घेण्यात आलेली महसूल विभागातील तलाठी भरतीची परीक्षा वैभवने दिली होती, मात्र त्यात त्याची निवड झाली नाही. दरम्यान, गावातील एका व्यक्तीमार्फत वैभवची ओळख तुळशीराम जाधव याच्याशी झाली. 'तलाठी भरतीची परीक्षा दिलेला उमेदवार असल्यास सांगा, पैसे देण्याची तयारी असल्यास नोकरी लावून देतो,' असे आमिष जाधवने दाखवले.

त्यानुसार ७ मे २०२६ रोजी गोधणी रोडवरील एका हॉटेलजवळ त्यांची भेट झाली. नोकरीच्या आमिषाला बळी पडून वैभव राठोड आणि त्याच्या कुटुंबीयांनी आरोपींना तब्बल २१ लाख १० हजार रुपये दिले.

काही दिवसांनी आरोपींनी वैभवच्या हातात तलाठी पदाचे नियुक्तीपत्र सोपवले. मात्र, पडताळणी केली असता हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वैभव राठोड याने तातडीने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तुळशीराम जाधव याच्यासह छत्रपती संभाजीनगर येथील चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, ठाणेदार अजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news