Yavatmal Fraud : शासकीय नोकरीच्या नावाखाली सहा लाखांनी फसवणूक

Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

यवतमाळ : अन्न पुरवठा विभागात शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाकडून तब्बल सहा लाख पाच हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विलास सुदाम मगरे (वय 40, रा. देवळी, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात घाटंजी तालुक्यातील कुर्‍हाड येथील अनिकेत देविदास तामगाडगे (वय 28) यांनी तक्रार दिली आहे. ते बी.एड. चे शिक्षण घेत असून सरकारी सेवेत जाण्याची त्यांची इच्छा होती. वर्ष 2023 मध्ये मोबाईलद्वारे त्यांची संशयित आरोपीशी ओळख झाली. तक्रारदाराच्या परिचयातील एका महिलेने आरोपीचे प्रभावशाली राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याचे सांगितले होते.

तसेच त्याच्या माध्यमातून सरकारी नोकरी निश्चित मिळू शकते, असा विश्वास तक्रारदाराला देण्यात आला. त्यानंतर संशयित आरोपीने अन्न पुरवठा विभागात ‘अन्न पुरवठा निरीक्षक’ पदावर नियुक्ती करून देण्याचे आश्वासन दिले. या कामासाठी एकूण 30 लाख रुपये खर्च येईल, असे सांगून सुरवातीला पाच लाख रुपये ‘टोकन’ म्हणून मागण्यात आले. 25 जानेवारी 2024 रोजी संशयित आरोपी कुर्‍हाड येथील तक्रारदाराच्या घरी आला.

नियुक्ती निश्चित असल्याचे सांगून त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर तक्रारदाराने नातेवाईकाच्या बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे आरोपीच्या खात्यावर पाच लाख रुपये पाठविले. यानंतर ‘नियुक्ती आदेशाची प्रक्रिया सुरू आहे’ असे सांगत आरोपीने आणखी पैशांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने स्वतःच्या तसेच भावाच्या फोन-पे खात्यातून एकूण एक लाख पाच हजार रुपये आरोपीला पाठविले.

त्यानंतर जवळपास दोन वर्षे आरोपी ‘आज-उद्या नियुक्तीपत्र मिळेल’, ‘काम अंतिम टप्प्यात आहे’ अशी आश्वासने देत राहिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने घाटंजी पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्राथमिक माहिती घेऊन घाटंजी पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news