

यवतमाळ : वीज प्रवाहित विद्युत तारांचा एकमेकांना घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने काढणीला आलेला तीन एकरातील गहू जळून खाक झाला. मंगळवारी (दि.१०) दुपारी नागापूर रूपाला शेत शिवारात ही घटना घडली. या आगीमध्ये दोन लाखांचे नुकसान झाले.
मिळालेली माहिती अशी की, नागापूर शिवारात शेत असलेल्या रेहाना सय्यद अख्तर यांच्या शेतावरील लोंबकळत असलेल्या जिवंत विद्युत तारांचे हवेमुळे एकमेकांना घर्षण झाले. त्यातून निघालेली ठिणगी काढणीला आलेल्या गव्हावर पडल्याने आग लागली. हवा जोरात सुरू असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरात उपस्थित असलेल्या शेतमजुरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाने त्वरित पोहोचून आग आटोक्यात आणली तोपर्यंत अख्तर यांच्या दोन एकर व रोहित तामसकर यांचा एक एकर गहू जळून खाक झाला होता. मात्र, शिवारातील इतर शेतकर्यांचा काढणीला आलेला गहू वाचला. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना त्यात भर पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.