

यवतमाळ : मध्यवर्ती बँकेत लावण्यात आलेल्या कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याच्या नैराश्येतून राळेगाव तालुक्यातील भांब येथील शेतकरी राजू बापुराव चुड्डुके (वय ४९) यांनी शनिवार, २५ जुलै रोजी रात्री विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले.
राजू चुड्डुके यांच्या नावे राळेगाव तालुक्यातील मुधापूर उजाड येथे १ हेक्टर ३९ आर शेतजमीन आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव येईल, या आशेने ते शनिवारी मध्यवर्ती बँकेच्या राळेगाव शाखेत गेले होते. मात्र, यादीत नाव न दिसल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. बँकेतून घरी परत आल्यावर ते प्रचंड मानसिक तणावात आले. त्यांनी रात्री १० वाजता घरातच विषारी औषध प्राशन केले.
कुटुंबियांनी तातडीने त्यांना राळेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत राजू यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत.
आधीच दुष्काळ, बियाणे व खतांचे वाढलेले दर आणि कर्जाचा बोजा यामुळे कुटुंब बिकट परिस्थितीत होते. कर्जमाफी हाच एकमेव आधार होता; तोही हिरावला गेल्याने राजू यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.