

यवतमाळ : वाळूचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी तुम्ही गावात मुक्कामाला असता, अशी हुज्जत घालत राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील एका तलाठ्यावर चक्क तलाठी कार्यालयात जाऊन तीन वाळू तस्करांनी जिवघेणा हल्ला चढवला. या हल्यात तलाठी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही गंभीर घटना काल मंगळवारी १७ डिसेंबरला रात्री ११ वाजताचे दरम्यान घडली.
मिलिंद लोहत असे जखमी तलाठ्याचे नाव असून ते राळेगाव महसूल विभागाअंतर्गत येत असलेल्या वाढोणा बाजार येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. तलाठी मिलिंद लोहत हे मुख्यालयी असताना प्रतीक वाढोणकर व यांच्यासोबत असलेल्या आणखी दोघांनी संगणमत करून लोखंडी रॉडने रात्री ११ वाजताच्या दरम्यान जीवघेणा हल्ला केला. यात तलाठी हे गंभीर जखमी झाले आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
तलाठी लोहोत यांना जखमी अवस्थेत नागरिकांनी राळेगाव येथील रुग्णालयामध्ये व नंतर सेवाग्राम येथे भरती केले. वाढोणा बाजार येथे प्रतीक वाढोणकरसह इतरांचे अवैध वाळूचे व्यवसाय आहे. तलाठी अवैध वाळू वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्नशील होते. तलाठी हे सतत परीसरातील रेतीघाट पिंजून काढत होते. तलाठ्याच्या धाकापोटी वाळूमाफिया चांगलेच धास्तावले होते. दरम्यान व्यवसाय बंद झाल्यामुळे वाढोणा बाजार येथील वाळू माफिया प्रतीक वाढोणकरसह इतरांनी हल्ला केल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणी तलाठी लोहत यांच्या फिर्यादीवरून प्रतिक वाढोणकर व इतर दोन सहकारी यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.