

यवतमाळ : चोरीच्या संशयातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. तालुक्यातील ईचोरी येथे रविवारी (दि.८) दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. किशोर राजू कुंभेकर असे मृताचे नाव आहे. आरोपी किसन शामा घोटकर याला अटक करण्यात आली आहे.
यवतमाळ तालुक्यातील ईचोरी येथील आरोपी किसन घोटकर याच्याकडे कोंबड्या आहेत. रविवारी सकाळच्या सुमारास घोटकर कुटुंबीयांना कोंबडा दिसेनासा झाला. याच दरम्यान घराबाहेर किशोर कुंभेकर त्याच्या मित्रासोबत उभा होता. कोंबडा चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय किसन घोटकर याला आला होता. त्यातून दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. आरोपीने लाकडी काठीने केलेल्या हाणामारीत किशोर कुंभेकर याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत घरी गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी मृताचे वडील राजू कुंभेकर यांनी लाडखेड पोलिस ठाणे गाठून आरोपी किसन घोटकर याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला. घटनेचे गांभीर्य ओळखून लाडखेड पोलिसांनी रात्रीच आरोपीला ताब्यात घेतले.