

यवतमाळ : आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी असलेल्या 'डायल ११२ या क्रमांकाचा गैरवापर करून पोलिसांना विनाकारण धावपळ करायला लावणे एका तरुणाला महागात पडले. खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी बिटरगाव पोलिसांनी २८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी, दि. २३ फेब्रुवारी रोजी रात्री ७:३२च्या सुमारास रघुनाथ दत्ता माणिकवाड (वय २८, रा. करंजी, ता. उमरखेड) याने 'डायल ११२' या क्रमांकावर नियंत्रण कक्षाला फोन केला. मला ८ ते १० अनोळखी व्यक्तींनी मारहाण केली. तातडीने मदत पाठवा, असा बनाव केला. घटनेचे गांभीर्य ओळखून बिटरगावचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी तत्काळ पथक रवाना केले. यामध्ये रवी गीते, मोहन चाटे, अर्जुन राठोड, प्रवीण जाधव, शरद चव्हाण यांचा समावेश होता. मात्र, पोलिसांनी तक्रारदार रघुनाथ याला फोन केला, मात्र त्याने मोबाइल बंद केला होता.
पोलिसांनी गावात शोध घेतला आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. तेव्हा गावात मारहाणीची कोणतीही घटना घडली नाही, अशी माहिती समोर आली. रघुनाथ याने पोलिसांचे मनुष्यबळ, वेळ आणि शासकीय वाहनाचा विनाकारण वापर व्हावा, या उद्देशाने जाणीवपूर्वक खोटी माहिती दिली होती. खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल केल्यामुळे प्रवीण जाधव यांच्या फिर्यादीवरून रघुनाथ माणिकवाड विरुद्ध कलम २१७, २२१ बीएनएस व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.