

यवतमाळ : प्रेमप्रकरणातून प्रेयसी तसेच तिच्या आईवर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला तर प्रेयसी गंभीर जखमी झाली. रक्तरंजीत थराराची ही घटना गुरुवार, १ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथील इंदिरानगर परिसरात घडली. या प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कांता सहदेव तेलंगे (४८) असे मृत आईचे नाव असून, त्यांची मुलगी तथा गंभीर जखमी प्रेयसी सोनू उर्फ शुभांगी गजानन सरकटे (३०) असे तिचे नाव आहे. सद्दाम उर्फ तसवर खाँ तैमुर खाँ (४०) रा. लाडखेड) असे या हल्लेखोराचे नाव असून, पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शुभांगी हिचे पती निधनानंतर लाडखेड येथील सद्दाम याच्यासोबत मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सद्दाम हा तिच्याच घरी राहत होता. नेहमी मात्र, घरगुती कारणांवरून आणि सततच्या वादामुळे त्याचे मृत कांता तेलंगे यांच्यासोबत खटके उडत असत. गुरुवारी मध्यरात्री त्यांच्यात पुन्हा जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या सद्दामने घरातील धारदार तलवारीने कांताबाई यांच्या पोटावर आणि मानेवर सपासप वार केले. या हल्ल्यात त्या जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. एवढ्यावरच न थांबता संशयिताने लाकडी दांड्याने प्रेयसी सोनुच्या डोक्यावरही वार केले.
घरातील आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाले. मात्र, नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता, जीवे मारण्याची धमकी देत अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक लांबे हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सद्दामला अटक करून गुन्ह्यात वापरलेली तलवार जप्त केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृताचे नातेवाईक शिवा दिलीप साठे यांच्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गंभीर जखमी सोनु हिची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ठाणेदार विनायक लांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.