Yavatmal Crime : कुटुंब लग्नात, चोरटे घरात; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास

Yavatmal Crime : कुटुंब लग्नात, चोरटे घरात; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास
Published on
Updated on

यवतमाळ : लग्नकार्यासाठी कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घरातून तब्बल पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बाजोरिया नगरातील विदर्भ हाउसिंग सोसायटीत गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी सचिन सुरेश आस्वार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, सचिन आस्वार आपल्या परिवारासह एका लग्नाच्या स्वागत समारंभासाठी बाहेरगावी गेले होते. दरम्यान, घरात कुणीही नसल्याची संधी साधून अनोळखी चोरट्यांनी दरवाजाचा कुलूप-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून आतील संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले आणि कपाटात ठेवलेली रोकड व मौल्यवान दागिन्यांवर हातसाफ केला.

गुरुवारी पहाटे सचिन आस्वार कुटुंबीयांसह घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता कपाटातील साहित्य विस्कळित झाले होते. कपाटाची पाहणी केली असता, त्यातील १ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण १ लाख ७४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान

आस्वार यांनी या घटनेची तातडीने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. या प्रकरणी अनोळखी चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही‘ कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून इतरही तांत्रिक बाबींच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news