

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा Yavatmal Crime News : गुप्तधनासाठी महिलेसह आणि तिच्या अल्पवयीन मुलीला सात महिन्यांपासून घरात डांबून ठेवूनअमानुष मारहाण करत शरीरभर चटके देण्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ शहरातील वंजारी फैल परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पीडितांची सुटका केली असून, आरोपी भोंदू बाबाला ताब्यात घेतले आहे. महादेव परसराम पालवे (४४ रा. वंजारी फैल) असे भोंदू बाबाचे नाव आहे. पोलिसांनी कारवाई करताच त्याने चाकूने स्वत:च्या मानेवर वार करीत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यात तो जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वंजारी फैल परिसरामध्ये महादेव पालवे हा त्याच्या राहत्या घरात एका महिलेला आणि तिच्या मुलीला आणून अघोरी कृत्य करत होता. याची गोपनीय माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.
संशयित आरोपी महादेव पालवेसह त्याची पत्नी व मुलगी तसेच अन्य एक महिला आणि तिची मुलगी घरात आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी पालवे यांची चौकशी केली, असता त्याने घरात जाऊन चाकू सारख्या एका शस्त्राने स्वत:च्या मानेवर वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो जखमी झाला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत शासकीय रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी संपूर्ण घराची पाहणी केली. याशिवाय 'त्या' महिलेला आणि सोळा वर्षीय मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा हा गंभीर प्रकार उघडकीस आला. गेल्या वर्षभरापासून अघोरी पूजा पाठ करीत 'त्या' महिलांना शरीरावर चटके देऊन मारहाण करीत असल्याचे संबधीत महिलेने आणि मुलीने सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांना अन्न पाण्याशिवाय एका खोलीत डांबून ठेवत होता. यावेळी पोलिसांनी घरातून जादूटोणा व गुप्तधनासंबंधी काही संशयास्पद साहित्य जप्त केले आहे. अघोरीप्रथेतून मारहाण आणि चटके देण्याचा नेमका प्रकार तो कशा करिता करीत होता. तसेच यात अन्य आरोंपीचा सहभाग आहे का ? या अनुषंगाने अधिक तपास पोलीस करीत आहे.